परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते
निघता निघता वाटच वळते, पावलांत घुटमळते
डोळ्यांमधला ढगाआडचा पाऊस येतो
प्रतिबिंबांचा प्रदेश सगळा अंधुक अंधुक होतो
दूर दूर पण पुन्हा नव्याने वीज अशीच चमकते
कधी हसरा, दुखरा, क्षण यावा, निघून जावा
कधी अचानक जावे जखमांच्या गावा
लपवून आंसू हसरे गाणे मनामनात उमलते
हा रंगांचा शामल हिरवा उजेड झाला
आणि दिलेला हात कुणाचा उजाड झाला
काटा कोमल होतो आणिक हृदयी फूलच सलते
फुलातला हा गंध कुणाला दिसला नाही
कसा धरावा मुठीत तारा लपला नाही
आभासातून भास फिरावा तसे तसेच उमगते