हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे
नितळ निळाई आकाशाची अन् क्षितिजाची लाली
दंवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी
अहो, आता विसरा हे सगळं,
इथं इमारतींच्या जंगलातला वनवास
त्यातून दिसणारं टीचभर आकाश
आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास
कोठेही जा अवतीभवती निसर्ग एकच आहे
हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे
पानांमधली सळसळ हिरवी अन् किलबील पक्षांची
झुळझुळ पाणी वेळुमधुनी खुळी शीळ वार्याची
इथं गाणं लोकलचं
पाणी तुंबलेल्या नळाचं
आणि वारं डोक्यावर गरगरणार्या पंख्यांचं
इथेतिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे
हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे
पाऊस झिमझिमणारा आणि पाऊस कोसळणारा
टपटप पागोळ्यांतून अपुल्या ओंजळीत येणारा
पाऊस म्हणजे रेनकोटचं ओझं
कपड्यांचा सत्यनाश आणि सर्दीला निमंत्रण
जगण्यावरचे प्रेम जणु हे धुंद बरसते आहे
हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे