सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला?
आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती बनवायाला सहज तिला
आई आवडे आधिक मला
गोजिरवाणी दिसते आई, परंतू भित्री भागूबाई
शक्तीवान किती असती बाबा, थप्पड देती गुरख्याला
आवडती रे वडील मला
घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन् चॉकलेट तर, बाबा घेती रस्त्याला
आवडती रे वडील मला
कुशीत घेता रात्री आई, थंडी वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे, सुगंध तिचिया पाप्याला
आई आवडे आधिक मला
निजता संगे बाबांजवळी, भूते-राक्षसे पळती सगळी
मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्याच्या आपुल्या गालाला
आवडती रे वडील मला
आई सुंदर कपडे शिवते, पावडर तीट तीच लावते
तीच सजविते सदा मुलींना रिबिन बांधून वेणीला
आई आवडे अधिक मला
त्या रिबिनीला पैसे पडती, ते तर बाबा मिळवूनी आणती
कुणी ना देती पैसा-दिडकी, घरात बसल्या आईला
आवडती रे वडील मला
बाई म्हणती माय पूजावी, माणूस ती न असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावूनी पायाला
आई आवडे अधिक मला
बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई
बाबा येता भिऊन जाई सावरते ती पदराला
आवडती रे वडील मला
धडा शिक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबासंगे लग्नाला
आई आवडे अधिक मला