तुला न कळले
मला न कळले, कसे प्रीतीचे धागे जुळलेले
ते डोळ्यांचे पहिले मिलन
ते पहिले स्मित ते संवेदन
शब्दाहून ते गोड मुकेपण
कसे कळीचे फूल उमलले
थोडी लज्जा, थोडी भीती
ओढ अनावर आतुरता ती
कशी जागली हृदयी प्रीती
कसे मनातून गीत उजळले
स्पर्श लाजरा होता पहिला
काळ थांबुनी उभा राहिला
कणाकणांतून वसंत फुलला
कुणा कुणाला कसे जिंकिले