स्पर्शाच्या गहिऱ्या जहराची
ती रात्र कुसुंबी बहराची
ती डोळे जडवून मला म्हणाली राया
वय ऐनातील हे नका घालवू वाया
त्या नजरबंदीच्या कहराची
घातली लाडकी हळुच खुणेची शीळ
चांदण्यात भिजला गालावरला तीळ
अशी मदन झोकल्या प्रहराची
काळीज बुडवुनी जाय मधाची लाट
हातात जडवुनी हात शोधिली वाट
स्वप्नांच्या धूसर शहराची