कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू
चाहुल देऊन नका कुणी ग चिमण्याला जागवू
नकोस चंद्रा येऊ पुढती
थांब जरासा क्षितिजावरती
चमचमणारे ते चंदेरी चाळ नको नादवू
पुष्करिणीतून गडे हळुहळु
जललहरी तू नको झुळुझुळु
नकोस वाऱ्या, फुलवेलींना फुंकरीने डोलवू
नकोस मैने तोल सावरू
नकोस कपिले अशी हंबरू
यक्ष-पऱ्यांनो स्वप्नी नाचुन नीज नका चाळवू
जगावेगळा छंद ग याचा
पाळण्यातही खेळायाचा
राजी नसता अखेर थकुनी पंख मिटे पाखरू