खरा तो एकची धर्म
जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित
जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे
जयांना कोणी ना जगती
सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे
समस्तां धीर तो द्यावा
सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे
सदा ते आर्त अतिविकल
जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे
प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे
असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्था प्राणही द्यावे