जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जाता राहील कार्य काय ?
सूर्य तळपतील, चंद्र झळकतील
तारे अपुला क्रम आचरतील
असेच वारे पुढे वाहतील
होईल काही का अंतराय ?
मेघ वर्षतील, शेते पिकतील
गर्वाने या नद्या वाहतील
कुणा काळजी की न उमटतील
पुन्हा तटावर हेच पाय
सखे सोयरे डोळे पुसतील
पुन्हा आपुल्या कामी लागतील
उठतील, बसतील, हसूनी खिदळतील
मी जाता त्यांचे काय जाय ?
अशा जगास्तव काय कुढावे
मोही कुणाच्या का गुंतावे
हरिदूता का विन्मुख व्हावे
का जिरवू नये शांतीत काय ?
jan paḻbhar mhaṇtīl hāy hāy
mī jātā rāhīl kāry kāy ?
sūry taḻptīl, chaṅdr jhaḻktīl
tāre apulā kram āchartīl
asech vāre puḍhe vāhtīl
hoīl kāhī kā aṅtrāy ?
megh varṣhtīl, śhete piktīl
garvāne yā nadyā vāhtīl
kuṇā kāḻjī kī na umaṭtīl
punhā taṭāvar hech pāy
sakhe soyre ḍoḻe pustīl
punhā āpulyā kāmī lāgtīl
uṭhtīl, bastīl, hasūnī khidaḻtīl
mī jātā tyāṅche kāy jāy ?
aśhā jagāstav kāy kuḍhāve
mohī kuṇāchyā kā guṅtāve
haridūtā kā vinmukh vhāve
kā jirvū naye śhāṅtīt kāy ?