तुझे रूप सखे गुलजार असे
काहूर मनी उठले भलते
दिनरात तुझा ग ध्यास जडे
हा छंद जिवाला लावी पिसे
ती वीज तुझा नजरेमधली
गाली खुलते रंगेल खळी
ओठांत रसेली जादुगरी
उरी हसती गुलाबी गेंद कसे
नखऱ्यात तुझ्या ग मदनपरी
ही धून शराबी दर्दभरी
हा झोक तुझा घायाळ करी
कैफात बुडाले भान असे
ती धुंद मिठी, बेबंद नशा
श्वासांत सखे विरतात दिशा
बेहोष सुखाच्या या गगनी
मी आज मला हरवून बसे