देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला
भाळावरी बसे या निष्ठुर जी कुठार
घावातुनी उडावे कैसे सुधा तुषार
निर्जीव जन्म माझा या अमृतात न्हाला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला
माझ्या मुलास लाभे सुख-छत्र रे पित्याचे
ही प्रीतीची कमाई की भाग्य नेणत्याचे
उध्वस्त मांडवाच्या दारी वसंत आला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला
सौख्यात नांदताना का दुःख आठवावे
जे नामशेष झाले ते काय साठवावे
हास्यात आजच्या ह्या कळ कालची कशाला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला